कोल्हापूर: कोल्हापूरला देशभरात कुस्तीपंढरी म्हणून ओळखले जाते. याच कोल्हापूरात अनेक महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पैलवान घडले आहेत. आजही देशभरातील मुलं कोल्हापूरच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवताना दिसतात. असे असले तरी तब्बल 21 वर्षांपासून कोल्हापूरच्या मातीला महाराष्ट्र केसरीची ( Maharashtra Kesari ) प्रतीक्षा होती, ती यावर्षी पृथ्वीराज पाटील याच्या रूपाने पूर्ण झाली. कोल्हापूरात अनेक मातब्बर मल्ल आहेत, तरीही महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवायला इतकी प्रतीक्षा का करावी लागली ? काय आहेत याची कारणे ? आणि आता प्रशासनाने काय केले पाहिजे याबाबतचाच विशेष रिपोर्ट.
अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची उभारणी गरजेची - कोल्हापूरात आजपर्यंत अनेक पैलवान घडले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थरावर आपली चमक दाखवत आहेत. काही जण तर ऑलम्पिकमध्येही गेले आहेत. मात्र या कुस्ती पंढरीत ज्या पद्धतीने इतर काही शहरांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झाली आहे, ती इथे झाली नाहीये. शासनाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील आणि क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी म्हंटले आहे. ट्रेनिंग सेंटर असल्यावर पैलवानांना जे तालमीमध्ये शिकायला मिळते, त्यापेक्षा अजूनही अत्याधुनिक गोष्टींचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या पुढच्या कामगिरीमध्ये ही विशेष असे यश मिळताना पाहायला मिळेल असेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रामध्ये सायकॉलॉजी, न्यूट्रेशन, स्टीम बाथ, फिजिओथेरपी, मसाजर अशा अनेक सुविधा पैलवांना घेता येतात, शिवाय प्रशिक्षक सुद्धा चांगल्या दर्जाचे मिळाले तर त्यांचा भविष्यात या पैलवानांना खूप फायदा होईल, असेही यावेळी कृष्णात पाटील ( Wrestling coach Krishnat Patil ) म्हणाले.
खासबाग मैदानाची दुरावस्था (Khasbaug ground Bad condition )-दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला ( Jarshi Chhatrapati Shahu Maharaj ) राजाश्रय दिला होता. शिवाय भव्य दिव्य असे खासबाग मैदान बनवले होते. आजही हे मैदान अतिशय भक्कम आणि सुस्थितीत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत चालले आहे. याबाबत नेहमीच स्थानिक तसेच जागरूक नागरिक प्रशासनाला जाग आणत आले आहेत. सध्यातर या मैदानात जवळपास 5 फुटांपर्यंत गवत उगवल्याचे चित्र पाहायला मिळते. केवळ गवत काढणे म्हणजे प्रशासनाचे काम संपले असे नाही, तर या मैदानाची योग्य काळजी घेऊन शाहू महाराजांचा हा कृतिशील वारसा सुद्धा जपला पाहिजे. जेणेकरून भावी पिढीला हे वैभव तेंव्हा सुद्धा पाहता येईल, असेही यावेळी अरुण पाटील म्हणाले.