बर्मिंगहॅम: 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अजय सिंगने ( Weightlifter Ajay Singh ) चमकदार कामगिरी केली, पण देशाला 7 वे पदक मिळवून देण्यापासून अजयला मुकावे लागले. वेटलिफ्टिंगमध्ये 25 वर्षीय अजय सिंगने एकूण 319 किलो वजन उचलले, पण त्याला पदक मिळवता आले नाही.
पुरुषांच्या 81 किलो वजनी गटात तो चौथ्या स्थानावर राहिला. त्याने स्नॅचमध्ये 143 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 176 किलो वजन उचलले. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सहा पदके जिंकली आहेत आणि सर्वच पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. अजयने 2021 मध्ये उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने 81 किलो वजनी गटात एकूण 322 किलो वजन उचलले. या कामगिरीच्या जोरावर त्याला बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये ( Birmingham Commonwealth Games 2022 ) स्थान मिळाले.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) सुरू होण्याच्या एक महिना आधी अजय बर्मिंगहॅमला पोहोचला होता. तेथे त्याने प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली होती. अजयसाठी इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो जवळपास एक दशकापासून तयारी करत आहेत. यावेळी त्याचे पदक हुकले असले तरी आगामी स्पर्धांमध्ये त्याच्याकडून पदकांची अपेक्षा आहे.