भोपाळ : खेलो इंडिया स्पर्धेमध्ये बुधवारचा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला. महाराष्ट्रातील खेळाडूंनी 8 सुवर्ण पदकांसह एकूण 21 पदके जिंकली. ज्यामध्ये 6 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी योगासनात सर्वाधिक पदके पटकावली. महाराष्ट्राने योगासनात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 12 पदके जिंकली. यासह राज्याने सायकलिंग स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले. तसेच महाराष्ट्राने नेमबाजीत एक कांस्य आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. टेबल टेनिसमध्ये देखील राज्याने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.
महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत पदकतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. पदकतालिकेत यजमान मध्य प्रदेशची घसरण झाली आहे. मध्य प्रदेशच्या खात्यात 8 सुवर्णांसह एकूण 11 पदके जमा झाली आहेत. पदकतालिकेत मध्य प्रदेश सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओडिशाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओडिशाने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 8 पदके जिंकली आहेत. तर हरियाणाचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. हरियाणाने 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 6 पदके मिळवली आहेत. टेबलमध्ये राजस्थान पाचव्या स्थानावर कायम आहे. राजस्थानने एकूण 6 पदके मिळवली आहेत. ज्यामध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदके आहेत. तर तामिळनाडू सहाव्या क्रमांकावर आहे. राज्याने 1 सुवर्ण, 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकांसह एकूण 4 पदके पटकावली आहेत. पश्चिम बंगाल सातव्या तर केरळ आठव्या स्थानावर आहे.