नंदुरबार- आसाममधील गुवाहाटी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या 'खेलो इंडिया युथ गेम्स' या स्पर्धेत उंच उडी या क्रीडा प्रकारात नंदूरबारच्या अभय गुरवने सुवर्णपदक जिंकले. त्याने २.७ मीटर उंच उडी मारत पदकावर नाव कोरलं. आदिवासी भागात मुबलक क्रीडा साहित्य तसेच वातावरण नसताना अभयने ही कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीने जिल्हाभरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
अभय नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील रहिवाशी आहे. त्यांची घरची परिस्थीती बेताचीच. घरात शिक्षणाचे किंवा क्रीडाचे कुठलेच वातावरण नाही. केवळ जिद्दीच्या जोरावर अभयने हे यश मिळवले.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर अभयने सांगितले की, 'विजयाचे श्रेय माझी आत्या शीलाबाई यांना अर्पण करतो. माझ्या आईचे २००९ मध्ये निधन झाले. या धक्क्याने गेली १९ वर्षे माझे वडील आजारी आहेत. आत्याच माझा सांभाळ करते. आईच्या निधनानंतर काही वर्षे, मी चंद्रकांत अण्णा बालकाश्रमात राहिलो. आता मी नंदुरबार येथील यशवंत महाविद्यालयात शिकत आहे. माझे प्रशिक्षक मयूर ठाकरे हेच मला आर्थिक सहकार्य करीत आहेत.'