गुवाहाटी - तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पूजा दानोळे आणि मधुरा वायकर यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पहिल्यांदाच या स्पर्धेत समावेश करण्यात आलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात दोघींनी सुवर्णपदक जिंकले. पूजाने १७ वर्षे तर मधुराने २१ वर्षाखालील गटात ही कामगिरी नोंदवली.
मुंबईच्या मधुरा वायकरने २० किलोमीटर अंतराची शर्यत ३० मिनीट ३६ सेकंदात जिंकली. तिचा सायकलिंगचा वेग ताशी ३९ प्रति किलोमीटर इतका होता. तिने कर्नाटकाच्या मेघा गुगड आणि सौम्या अंतापूरला मागे टाकले.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या पूजा दानोळे हिने १७ वर्षांखालील गटात सोनेरी कामगिरी केली. तिने १५ किलोमीटरची शर्यत २४ मिनिटे १८ सेकंदात पूर्ण केली. दिल्लीच्या लिआक्रेस एंजनो आणि चंडिगढच्या रीत कपूर तिने मागे टाकत ही कामगिरी केली.