नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज आणि भाजपा खासदार गौतम गंभीरनेही ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन लोक कपिल देव यांच्या तोंडाला कापड बांधून त्यांना एका ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून कपिल देव यांचे अपहरण झाल्याचा संशय भाजपा खासदार गौतम गंभीरनं केला.
क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक्स या सोशल मीडियावर कपिल देवचा कथित व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ही क्लिप आणखी कोणाला मिळाली का? असं घडलं नसावं, अशी आशा आहे. कपिल देव ठीक आहेत. गंभीरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. व्हिडिओमध्ये कपिल देव आहेत की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कपिल देव असला तरी कदाचित ते कोणत्यातरी जाहिरातीचे शूटिंग करत असावेत, असा क्रिकेट चाहत्यांचा अंदाज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल देवचे मॅनेजर राजेश पुरी यांनी व्हिडिओ हा जाहिरातीचा भाग असल्याचं म्हटलं आहे.