नवी दिल्ली:ज्योती याराजीने ( Jyoti Yaraji ) सायप्रस येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स मीटमध्ये 100 मीटर अडथळा शर्यत जिंकून 13.23 सेकंद वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला. लिमासोल येथे झालेल्या या स्पर्धेत आंध्रच्या 22 वर्षीय ज्योतीने सुवर्णपदक जिंकले ( Jyoti Yaraji won the gold medal ). केवळ महिन्याभरापूर्वी कायदेशीर मर्यादेपेक्षा हवेपासून जास्त मदत मिळाल्याने तिची राष्ट्रीय विक्रमी कामगिरी मान्य केली नव्हती. जुना विक्रम अनुराधा बिस्वालच्या नावावर होता, जो तिने 2002 मध्ये 13.38 सेकंदात केला होता.
सायप्रस इंटरनॅशनल मीट ( Cyprus International Meet ) ही जागतिक ऍथलेटिक्स उपखंडीय टूर चॅलेंजर क्लास डी स्पर्धा आहे. भुवनेश्वरमधील रिलायन्स फाऊंडेशन ओडिशा अॅथलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करणाऱ्या ज्योतीने गेल्या महिन्यात कोझिकोड येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये 13.09 सेकंद वेळ नोंदवली, परंतु वाऱ्याचा वेग अधिक 2.1 मीटर प्रति सेकंद ही वैध मर्यादा अधिक 2.0मीटर असल्याने तिला अवैध घोषित करण्यात आले. 2020 अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ज्योतीने 13.03 सेकंद वेळ नोंदवली होती, पण ती अवैध घोषित करण्यात आली. कारण राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने स्पर्धेत तिची चौकशी केली नाही आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचा कोणताही तांत्रिक प्रतिनिधी तेथे उपस्थित नव्हता.