बँकॉक -सध्या सुरू असलेल्या २१ व्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत अभिषेक वर्मा आणि ज्योति सुरेख यांच्या जोडीने इतिहास रचला. बुधवारी खेळवलेल्या गेलेल्या कंपाउंड स्पर्धेत या जोडीने सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा -Cricket Record : कसोटीच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक वेळा ६०० पार धावा करणारे संघ..
वर्मा आणि ज्योती यांनी चिनी तैपेईच्या यी-सुसान चेन आणि चिह-लुह चेन यांना १५८-१५१ ने पराभूत करून भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदक अशी एकूण सात पदके जिंकली आहेत. आर्चरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या निलंबनामुळे भारताचे खेळाडू वर्ल्ड आर्चरी असोसिएशनच्या ध्वजाखाली खेळत आहेत.
अतानू दासच्या नेतृत्वाखाली भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तीन कांस्यपदके जिंकली आहेत. कोरियाच्या जिन हायेक ओहला ६-५ ने मात देत दासने प्रथम वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. सोमवारी मिश्र रिकर्व गटात दीपिका कुमारीसोबत कांस्यपदक जिंकल्यानंतर, पुरुषांच्या रिकर्व गटातही पदक मिळवून दासने कांस्यपदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली.