उलान-उदे -रशिया येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जमुना बोरोने आगेकुच केली आहे. या स्पर्धेत ५४ किलो वजनी गटात दमदार प्रदर्शन करताना तिने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. दुसऱ्या फेरीत जमुनाने पाचव्या सीडेड अल्जेरियाच्या ओयुदाद सोफोऊला ५-० ने मात दिली.
हेही वाचा -सावधान इंडिया! गहुंजेची खेळपट्टी करू शकते घातपात, वाचा काय सांगतो इतिहास
आक्रमक पद्धतीने खेळणाऱ्या जमुनाला सामन्याच्या पाचही पंचांनी गुण दिले. तिला पंचाकडून २८-२९, २७-३०, २७-३०, २७-३०, २७-३० असे गुण मिळाले आहेत. यापूर्वी, सहा वेळा जगज्जेती ठरलेली मेरी कोमने ५१ किलो वजनी गटात उपउपांत्य फेरी गाठली आहे. मेरी कोमने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडची बॉक्सर जुटामास जितपाँगचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. या विजयासह ३६ वर्षीय मेरी कोमने सातव्या जेतेपदाकडे पाऊल टाकले आहे. मेरी कोम फक्त भारतातच नव्हे तर विश्व बॉक्सिंगचेही प्रेरणास्थान आहे. सहा वेळा सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर मेरी कोम आता रशियाच्या भूमीतही नव्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे.
दुसरीकडे, ४८ किलो वजनी गटात झालेल्या या सामन्यात भारताच्या मंजू राणीने नेझुएलाच्या रोजस तायोनीस सेडेनोवर ५-० अशी मात केली. सहाव्या मानांकित मंजू राणीला जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.