दोहा :फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) चे आज तीन सामने खेळले जाणार आहेत. दिवसाच्या पहिल्या सामन्यात इराणने वेल्सचा 2-0 असा पराभव केला. (Iran Vs Wales) कतार विश्वचषकाच्या सहाव्या दिवशी इराणने वेल्सचा पराभव करून पहिला विजय मिळवला. इराणने ‘ब’ गटातील वेल्सविरुद्ध निर्धारित वेळेनंतरच्या इंज्युरी टाइममध्ये दोन गोल करत हा सामना जिंकला. या विजयासह इराणचे तीन गुण झाले आहेत. ब गटात इराणला मागील सामन्यात इंग्लंडकडून ६-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर, यूएसए आणि वेल्स यांच्यातील मागील सामना 1-1 असा बरोबरीत संपला होता.
राझियानने दुसरा गोल केला : पहिला गोल केल्यानंतर इराणचा संघ थांबला नाही. त्यांनी आणखी एक गोल केला. रामीन रझियानने एक्स्ट्रा टाईममध्ये गोल केला (90+11).
चेश्मीने केला इराणसाठी पहिला गोल : रुबेज चेश्मीने इराणचा पहिला गोल केला. त्याने एक्स्ट्रा टाईममध्ये (९०+८) गोल केला. हा गोल देखील खास आहे, कारण या विश्वचषकातील पेनल्टी क्षेत्राबाहेर केलेला हा पहिला गोल आहे.
वेल्सच्या गोलरक्षकाला विश्वचषकाचे पहिले रेडकार्ड :वेल्सचा गोलरक्षक वेन हेनेसी याला ८६व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आले. इराणचा स्ट्रायकर तारेमीला बॉक्सच्या बाहेर रोखण्यासाठी त्याने त्याला धोकादायकपणे टॅकल केले. हेनेसीच्या जागा राखीव गोलरक्षक डेनी वॉर्डने घेतली.
सामन्याच्या हाफ टाइमपर्यंत एकही गोल नाही : इराण आणि वेल्स संघांना सामन्याच्या हाफ टाइमपर्यंत एकही गोल करता आला नाही. वेल्सचा कर्णधार गॅरेथ बेललाही आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. पहिल्या हाफमध्ये वेल्सचा चेंडूवर अधिक प्रमाणात ताबा (64%) होता. वेल्सने 4 वेळा गोलसाठी प्रयत्न केले, मात्र गोल होऊ शकला नाही. त्यातील दोन फटके निशाण्यावर असले तरी इराणच्या गोलरक्षकाने चांगला बचाव केला.