सिडनी - ऑलिम्पिकसाठी कोरोना लसीची आवश्यकता असल्याच्या मताला जॉन कोट्स यांनी फेटाळले आहे. कोट्स हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या समन्वय आयोगाचे प्रमुख आहेत. काही शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी कोरोना लस ऑलिम्पिकसाठी आवश्यक असल्याचे मत दिले होते.
कोट्स म्हणाले, “डब्ल्यूएचओकडून (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) घेत असलेल्या सल्ल्यानुसार आम्ही या तारखेची योजना आखत आहोत. पण हे लसीवर अवलंबून नाही. ही एक छान लस असेल. परंतु आम्ही डब्ल्यूएचओ आणि जपानी आरोग्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत आहोत.”
कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहे. पण, तरीही या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणात आला नाही, तर या स्पर्धा थेट रद्द होऊ शकतात, अशी माहिती आयोजक समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी दिली आहे.
जपानच्या एका दैनिकाला मुलाखत देताना मोरी यांनी प्रतिक्रिया दिली. ''2021 मध्ये कोरोनावर नियंत्रण आले नाही तर, ही स्पर्धा रद्द होऊ शकते. यापूर्वी जागतिक युद्धाच्या वेळीही या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तर व्हायरसवर नियंत्रण ठेवले तर, आम्ही पुढच्या उन्हाळ्यात ऑलिम्पिकचे आयोजन करू'', असे मोरी यांनी सांगितले आहे.
एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल हेल्थचे प्राध्यापक देवी श्रीधर यांनी ऑलिम्पिकचे आयोजन ही लस शोधण्यावर अवलंबून असू शकते असे म्हटले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये कोरोनाच्या १३,७०० घटनांमध्ये ३९४ मृत्यूची नोंद झाली आहे.