नवी दिल्ली - इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढाईसाठी ७१, १४, ००२ रुपयांचे योगदान दिले आहे. या लढ्यात योगदान आणि समर्थन देणार्या सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघ, राज्य ऑलिम्पिक संघटना आणि इतर महासंघ आणि संस्था यांचे आयओएने आभार मानले.
या आव्हानात्मक काळात देशाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ऑलिम्पिक कुटुंब एकत्र आले आहे. आणि ही एकता विश्वास निर्माण करत आहे, असे आयओएने आपल्या निवेदनात म्हटले.
आयओए व्यतिरिक्त हॉकी इंडिया आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) प्रत्येकी २५ लाख रुपये दिले आहेत तर बीसीसीआयने ५१ कोटींचे योगदान दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विविध क्षेत्रातील 40 खेळाडूंची, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बैठक घेतली. यात त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अन्य खेळाडूंशी चर्चा केली. कोरोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदींनी खेळाडूंना मदत मागितली आहे.