मुंबई - भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदकावर समाधान मानावे लागले. 23 वर्षीय लवलिनाने महिला 69 किलो वजनी गटात ही कामगिरी केली. या स्पर्धेत तिचा उपांप्तपूर्व फेरीत सामना माजी जगज्जेती तैवानच्या चिन चेन हिच्याशी झाला होता. लवलिनाने या सामन्यात चीन चेनचा 4-1 ने पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. पण तिचा उपांत्य फेरीत पराभव झाला. यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. ईटीव्ही भारतने लवलिनाशी खास बातचित केली. यात तिने आपण कास्य पदकावर समाधानी नसल्याचे सांगत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत स्वप्न पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. लवलिनाने ईटीव्ही भारतच्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तर दिली. वाचा काय म्हणाली लवलिना...
प्रश्न - देशासाठी पदक जिंकल्यानंतर कसे वाटत आहे?
उत्तर - मला खूप चांगलं वाटत आहे. मी पदक जिंकून भारतात परतले. पण मी जर सुवर्ण पदक जिंकले असते तर याहून अधिक आनंद झाला असता.
प्रश्न - तु जे मिळवलं आहेस, त्यावर तु यावर समाधानी आहेस का?
उत्तर - मी खूप चिंतेत होते. कारण मी कधी कोणत्या सामन्यात पराभूत होण्याचा विचार केला नव्हता. मी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकण्याच्या इराद्याने टोकियोला गेले होते. मी सामन्यात फक्त सुवर्ण पदकाचा विचार करत होते आणि याच विचाराने मला पुढे नेलं. कास्य पदक जिंकल्यानंतर मी स्वत:ला दिलासा दिला की, ही फक्त सुरूवात आहे. लक्ष्य हे सुवर्ण पदक जिंकणं आहे. उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर मला खुप दु:ख झाला. मी या विचाराने चिंताग्रस्त होते की, मला भारताला सुवर्ण पदक जिंकून देता आलं नाही.
प्रश्न - मायदेशी परतल्यानंतर तुझे भव्य स्वागत करण्यात आले, याविषयी काय सांगशील?
उत्तर - मायदेशी परतल्यानंतर लोकांनी ज्या जल्लोषात स्वागत केलं, प्रेम दिलं. हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. देशासाठी पदक जिंकणे आनंददायी ठरते. माध्यमे आणि राजकीय नेत्यांसह प्रत्येकांनं आमचं स्वागत केलं. आपण खासकरून कोणत्याही खेळाडूने पदक जिंकलं की जल्लोष साजरा करण्यास सुरूवात करतो.