जकार्ता:दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू ( Olympic medalist PV Sindhu ) आणि जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन ( World Championships bronze medalist Lakshya Sen ) यांनी गुरुवारी आपापल्या लढती जिंकून इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बँकॉकमधील थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपदाच्या वेळी भारतीय संघाचा भाग असलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा 54 मिनिटांत 21-18, 21-15 असा पराभव केला.
मात्र, सिंधूला महिला एकेरीत थोडा संघर्ष करावा लागला. तिने तासभर चाललेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजांगचा 23-21, 20-22, 21-11 असा पराभव केला. सातव्या मानांकित सेनचा पुढील सामना तिसरा मानांकित चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनशी होईल, ज्याने थॉमस चषकात गेल्या महिन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या एकमेव सामन्यात भारताविरुद्ध तीन सामने जिंकले होते.
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर कडवे आव्हान असेल. चौथ्या मानांकित भारतीयाचा सामना पाचव्या मानांकित थायलंडच्या रत्चानोक इंतानोन आणि स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोर यांच्यातील विजेत्याशी होईल. बिगरमानांकित तुनजुंगविरुद्ध सिंधूने चांगली सुरुवात केली आणि आक्रमक खेळ करत 10-5 अशी आघाडी घेतली. लांब रॅलीचा तिने सुरुवातीला चांगला वापर केला.