कोलकाता -भारतीय टेबल टेनिस महासंघाने (टीटीएफआय)अव्वल महिला टेटेपटू मनिका बत्रा हिची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. खेलरत्नसाठी मनिकाचे नाव पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
टीटीएफआयचे सरचिटणीस खासदार सिंग यांनी ही माहिती दिली. मनिकाने 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांसह एकूण चार पदके जिंकली होती. 24 वर्षीय मनिकाने टेबल टेनिसमध्ये भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत अचंता शरथ कमलसह तिला रौप्यपदक जिंकण्यातही यश आले.