मुंबई - भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे लग्न बंधनात अडकला आहे. राहुलने रविवारी (३ जानेवारी) अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी लग्नगाठ बांधली. पुण्यातील बावधान येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राहुल आणि ऐश्वर्याचा साखरपूडा ऑक्टोबर २०१९ मध्ये पार पडला होता. त्यानंतर त्या दोघांनी रविवारी लग्नगाठ बांधली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी देखील या नवविवाहित जोडप्याला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
शिष्य बनला जावई
राहुल आवारे याचे सासरे काकासाहेब पवार हे कुस्तीपटू आहेत. राहुलने त्यांच्याकडून कुस्तीचे धडेही गिरवले आहेत. काकासाहेबांनी भारताला ३१ पदके जिंकून दिली आहेत. तसेच पुण्यात त्यांचे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलही आहे. आता लग्नानंतर या दोघांमध्ये गुरु-शिष्याबरोबर सासरे आणि जावई हे नवे नातेही निर्माण झाले आहे.
राहुल आवारे हा मूळचा बीडचा असून त्याने २०१८ ला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच २०१९ च्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आणि आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्याची डिसेंबर २०२० मध्ये पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा -ऑलिम्पिकसाठी आष्टीच्या अविनाश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत
हेही वाचा -Year Ender 2020: यावर्षी लग्नबंधनात अडकलेले खेळाडू जाणून घ्या...