टोकियो - भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने सामन्यादरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षकाचा सल्ला ऐकण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. मनिका बत्राने आज संघर्षपूर्ण सामन्यात युक्रेनच्या मार्गार्टा पेसोत्स्काचा 4-11, 4-11, 11-7, 12-10, 8-11, 11-5, 11-5 असा पराभव केला. हा सामना 7 गेमपर्यंत गेला. परंतु प्रशिक्षकाचा सल्ला ऐकण्यास नकार दिल्याची घटना शनिवारी घडली.
काय आहे नेमका वाद -
मनिकाचे खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांना बऱ्याच वादानंतर टोकियोला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यांना सामन्याच्या वेळेस हजर राहण्यास आयोजकांनी परवानगी दिलेली नाही. पण त्यांना फक्त सरावाच्या दरम्यान येण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान, परांजपे यांना सामन्याच्या वेळेस उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मानिका बत्राने केली होती.
मानिकाची ही मागणी आयोजकांनी फेटाळली आणि राष्ट्रीय प्रशिक्षकच सामन्याच्या वेळेस हजर राहू शकतील, असे सांगितलं. तेव्हा पारा चढलेल्या मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिल्याचे भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे सल्लागार एम. पी. सिंह यांनी सांगितलं. त्यांनी ही माहिती पीटीआयला बोलताना दिली. दरम्यान, शनिवारी मनिका बत्राचा पहिला सामना जागतिक क्रमवारीत 94व्या स्थानावर असलेल्या टीन टीन हिच्याशी झाला. हा सामना मनिकाने 4-0 असा सहज जिंकला.