मुंबई - भारताची महिला जलतरणपटू माना पटेल हिला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एएफआय) याची माहिती दिली. गुजरातची २१ वर्षीय माना १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये भाग घेणार आहे. या खेळासाठी पात्र ठरणारी माना तिसरी भारतीय तर पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. यापूर्वी जलतरणपटू साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.
भारतीय जलतरण महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ कोट्यातून माना पटेल हिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. विद्यापीठ कोट्यातून एका देशाच्या एका पुरुष आणि महिलेला ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येतो. यात मानाची निवड झाली. माना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये १ मिनिट २ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ नोंदविण्याचे लक्ष्य असल्याचे मानाने सांगितलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर माना पटेलने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, 'कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मला दुखापतीतून बरे होण्यास मदत झाली. त्यानंतर निराशाही आली होती. खूप दिवस पाण्यापासून दूर राहण्याची मला सवय नाही. पण आता ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येणार असल्याने मी उत्सुक आहे.'