नवी दिल्ली - भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेकडून (वाडा) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डोपिंग चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर 'वाडा'कडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. २९ वर्षीय रविकुमारने शूटिंग विश्वचषक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर २६ वर्षीय सांगवान याने २०१७ एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते. दरम्यान, नेमबाज रवि कुमार आणि बॉक्सर सुमित सांगवान हे दोघेही आता भारताच्या ऑलिम्पिक पथकाचे सदस्य असणार नाहीत.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी ७ महिन्याचा अवधी शिल्लक असून ऑलिम्पिकसाठी पात्रता सामने खेळवण्यात येत आहेत. या स्पर्धेआधीच भारताल जबर धक्का बसला आहे. रवि कुमार आणि सुमित सांगवान हे भारताचे महत्वाचे खेळाडू आहेत. दोघांनी अनेक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केलं आहे.