मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव वाढल्याने, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्वागत केले आहे. दुसरीकडे स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे अनेक खेळाडूंच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल, अशी कबुलीदेखील दिली.
आयओए महासचिव राजीव मेहता यांनी एक पत्र टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीला लिहले आहे. त्यात त्यांनी ऑलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
आम्ही सर्वजण खेळाडूंची आवश्यक मदत करणार असून भारतातील लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वच महासंघांसोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगून खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.
याआधी भारताचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की, 'टोकियो २०२० ऑलिम्पिकचे आयोजन वर्षभर पुढे ढकलण्याच्या आयओसीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जगभरातील खेळाडूंच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक होता. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्वच भारतीय खेळाडूंना योग्य ती मदत करण्याचे मी आश्वासन देतो. सद्यस्थितीचा त्यांच्या तयारीवर परिणाम होणार नाही, याचीही ग्वाही देतो. खेळाडूंनी निराश न होता. याहून सर्वोत्कृष्ट तयारी करावी यासाठी आम्ही योजना आखू. भारत २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.'
दरम्यान, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानेदेखील ऑलिम्पिकसाठी नव्याने तयारी करण्याचे आणि संशोधित योजना आखण्याचे संकेत दिले आहेत.