नवी दिल्ली : हॉकी इंडियाने मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 साठी 18 सदस्यीय पुरुष संघाची घोषणा केली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेकडे चीनमधील हांगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. स्पर्धेच्या पूल टप्प्यात भारताचा सामना कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि चीनशी होणार आहे.
हरमनप्रीत सिंगकडे संघाचे नेतृत्व : संघाचे नेतृत्व अव्वल ड्रॅग-फ्लिकर आणि बचावपटू हरमनप्रीत सिंग करणार आहे. तर आक्रमक मिडफिल्डर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक यांची गोलरक्षक म्हणून, तर जर्मनप्रीत सिंग, सुमित, जुगराज सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अमित रोहिदास यांची बचावपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
मनप्रीत सिंग मिडफिल्डमध्ये परतला : मिडफिल्डचे नेतृत्व हार्दिक, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग आणि नीलकंठ शर्मा यांच्याकडे असेल. तसेच मनप्रीत सिंगची मिडफिल्डमध्ये पुन्हा एंट्री झाली आहे. याआधी प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यात त्याचा बचावपटू म्हणून समावेश करण्यात आला होता. फॉरवर्ड लाइनमध्ये आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, गुरजंत सिंग, सुखजीत सिंग आणि एस कार्ती यांचा समावेश आहे. हे फॉरवर्ड्स गोल करण्यात, गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात आणि विरोधी बचावावर सतत दबाव टाकण्यात सक्षम आहेत.