नवी दिल्ली - भारताचा दिग्गज भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया याने विश्वविक्रमी कामगिरी करत पॅरा ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या निवड ट्रायलमध्ये त्याने आपलाच विक्रम मोडीत नवा विश्वविक्रम प्रस्तापित केला. देवेंद्र याने पूर्वी हा विक्रम २०१६ सालच्या रियो ऑलिम्पिकमध्ये केला होता.
नवी दिल्ली येथे टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी ट्रायल पार पडले. या ट्रायलमध्ये देवेंद्र झाझरिया याने ६५.७१ मीटर अंतरावर भाला फेकत नवा विश्वविक्रम प्रस्तापित केला. याआधी देवेंद्रच्या नावे ६३.९७ मीटर अंतरावर भाला फेकण्याचा विक्रम होता. देवेंद्रने यंदा हा विश्वविक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्तापित केला.
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या एफ-४६ गटामध्ये दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या ४० वर्षीय देवेंद्र झाझरिया याने ट्विट करत सांगितलं की, 'दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये आज पात्रता स्पर्धेत ६३.९७ मीटर अंतराचा आपला विश्वविक्रम मोडीत काढत, ६५.७१ अंतरावर भाला फेकत नवा विश्वविक्रम नोंदवत, टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो. मी हे यश प्रशिक्षक सुनिल तंवर आणि फिटनेट ट्रेनर लक्ष्य बत्रा यांनी माझ्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे मिळवू शकलो. या यशात माझ्या कुटुंबियांचे देखील योगदान आहे.'
विद्युत तारेचा धक्का बसला अन्...
आठ वर्षांचा असताना देवेंद्र खेळण्यासाठी एका झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याला तिथे असलेल्या विद्युत तारेचा जोरदार झटका बसला. या अपघातात त्याचा डावा हात कापावा लागला. त्यानंतर त्याने परिस्थितीशी झगडण्यास सुरवात केली. शिक्षणासोबत तो भालाफेकचा सराव करत होता. प्रशिक्षक आर डी सिंह यांची नजर देवेंद्रवर पडली आणि त्यानंतर देवेंद्र मुख्य प्रवाहात आला.