राउरकेला (ओडिशा) : भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी येथील भव्य बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर एइआयएच हॉकी प्रो लीगमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5-4 असा रोमहर्षक विजय नोंदवला. यापूर्वी भारताने विद्यमान विश्वविजेत्या जर्मनीविरुद्ध 3-2 असा विजय मिळवला होता. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने 14, 15 आणि 56व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिकच्या नोंदवली. तसेच जुगराज सिंग (18') आणि सेल्वम कार्ती (26') यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले.
सामन्याची अॅक्शन पॅक सुरुवात : ऑस्ट्रेलियाकडून जोशुआ बेल्ट्झ (३'), के विलोट (४३'), बेन स्टेन्स (५३') आणि अॅरॉन झालेव्स्की (५७') यांनी गोल केले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाने जोरदार झुंज देत सामन्याची अॅक्शन पॅक सुरुवात केली. यजमान भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या हॉकी चाहत्यांचे यावेळी उत्तम मनोरंजन झाले. मात्र, सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाने गोल करून यजमानांना जोरदार धक्का दिला. जोशुआ बेल्ट्झनेच भारतीय बचाव भेदून स्ट्रायकिंग सर्कलमध्ये प्रवेश करत हा गोल केला.
हरमनप्रीतच्या गोलने कमबॅक : मात्र या सुरुवातीच्या धक्क्याचा भारतीय संघाच्या लयीवर परिणाम झाला नाही. भारतीय संघ स्ट्रायकिंग सर्कलमध्ये प्रवेश करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत राहिला. या सततच्या प्रयत्नांचे फळ अखेर संघाला मिळाले. दिलप्रीत सिंगने सर्कलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात भारताला पेनॉल्टी कॉर्नर मिळवून दिला. पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करण्याची पहिली संधी गमावणाऱ्या हरमनप्रीतने या संधीला अचूकपणे साधत भारताचा पहिला गोल नोंदवला. अशाप्रकारे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाशी बरोबरी केली. फक्त एक मिनिटानंतर, अभिषेकने भारतासाठी आणखी एक पेनॉल्टी कॉर्नर मिळवला. यावर देखील हरमनप्रीतने चेंडू खाली ठेवत, पोस्टचा कोपरा शोधून गोल केला.