नवी दिल्ली - पोलंड येथे सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये भारतीय तिरंदाजांनी इतिहास रचला आहे. अंडर-18 महिला तिरंदाजांनी तुर्कीच्या संघाचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात तुर्कीचा 228-216 ने पराभव केला. प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु वर्षिणी सेंथिलकुमार या तिकडीने अंतिम सामन्यात कमाल केली. फक्त महिला संघानेच नाही तर पुरूष कंपाउंड संघाने देखील सुवर्ण पदक जिंकले आहे.
प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु वर्षिणी सेंथिलकुमार या तिकडीने 10 ऑगस्ट रोजी कॅडेट कंपाउंड महिला संघाच्या स्पर्धेत 2160 मधील 2067 गुण मिळवत अव्वलस्थान पटकावले होते.
भारतीय खेळाडूंचे हे गुण विश्वविक्रमापेक्षा जास्त आहेत. याआधी अमेरिकेच्या संघाने 2045 गुण मिळवले होते. भारतीय संघाने त्यांचा हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.