बुसान (दक्षिण कोरिया) : भारताने आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपचे विजेतेपद आपल्याकडे कायम राखले आहे. शुक्रवारी दक्षिण कोरियातील डोंग - युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटरमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणचा 42 - 32 असा पराभव केला. आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपच्या आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 9 आवृत्त्यांमधील भारताचे हे आठवे विजेतेपद आहे. इराणने 2003 मध्ये एकदा हे विजेतेपद पटकावले होते.
पहिल्या हाफमध्येच आघाडी मिळवली : खेळाच्या पहिल्या पाच मिनिटांत इराणने भारतावर आघाडी मिळवली होती. तथापि, बचावपटूंचे काही टॅकल पॉइंट्स आणि पवन सेहरावत व असलम इनामदार यांनी केलेल्या यशस्वी चढाईमुळे भारताने इराणला 10 व्या मिनिटाला सामन्यातील पहिला ऑलआऊट दिला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी इराणच्या खेळाडूंवर दबाव आणणे सुरूच ठेवले आणि इराणला आणखी एक ऑलआऊट दिला. पहिल्या हाफच्या शेवटी भारताने 23 - 11 अशी आघाडी घेतली. इराणचा अष्टपैलू मोहम्मदरेझा चयानेहने उत्तरार्धात दोन गुणांच्या चढाईसह पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्याने 29 व्या मिनिटाला सुपर रेड करून भारताला पहिला ऑलआऊट दिला.
भारत साखळी फेरीत अपराजित : अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी इराणवर पकड मिळवली. शेवटी भारताने इराणवर 42 - 32 असा विजय मिळवला. आदल्या दिवशी, भारताने हाँगकाँगचा 64 - 20 असा पराभव केला होता. भारतीय संघ या स्पर्धेतील साखळी फेरीत अपराजित राहिला. भारताने साखळी फेरीतील सर्व 5 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. साखळी फेरीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर इराणने दुसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरी गाठली.
पुढचे लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय कबड्डी संघांसमोरचे पुढचे आव्हान 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणारी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा असेल. 2018 मध्ये जकार्ता येथे उपांत्य फेरीत इराणने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करत इराणने सुवर्ण पदक पटाकवले होते. भारताला या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. भारताला आता त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे.
हेही वाचा :
- Ambati Rayudu : अंबाती रायुडू नवी राजकीय इनिंग सुरू करण्याच्या तयारीत, लवकरच होणार खुलासा
- ICC World Cup 2023 : 'हे' चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, विश्वचषकावर वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी
- Cricket Matches Security Fee : क्रिकेट सामन्यांसाठीच्या सुरक्षा शुल्कात मोठी कपात, तिकीट कमी होण्याची अपेक्षा