नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन संघाने रविवारी इतिहास रचला. थॉमस कपच्या अंतिम सामन्यात भारताने 14 वेळचा चॅम्पियन संघ इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. या संघाला पराभूत करून ( India beat Indonesia ) भारताने इतिहास रचला आणि थॉमस चषकाचे विजेतेपद प्रथमच पटकावले.
भारतासाठी लक्ष्य सेनने ( Lakshya Sen ) इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंगचा 21-8, 17-21, 16-21 असा पराभव करून संघाला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीत भारताच्या सात्विक आणि चिराग जोडीने ( Satvik and Chirag ) धमाकेदार खेळ दाखवत 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात के श्रीकांतने जोनाथनचा सरळ गेममध्ये 21-15, 23-21 असा पराभव करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून देत ऐतिहासिक विजय मिळवला.
गतविजेत्या इंडोनेशियाचा या स्पर्धेत मोठा विक्रम असून सध्याच्या स्पर्धेत हा संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारतीय पुरुष संघाने मात्र मलेशिया आणि डेन्मार्कसारख्या संघांना पराभूत करून प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आणि कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आपल्यात असल्याचे दाखवून दिले. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. चांगल्या मानांकन असलेल्या संघाविरुद्ध भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नव्हती आणि गेल्या दोन सामन्यांमध्ये पिछाडीवर पडूनही संघाने मानसिक ताकद दाखवून विजय मिळवला.
इंडोनेशियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर भारताला समूह टप्प्यात चायनीज तैपेईविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागला. बाद फेरीत इंडोनेशियाने जपानला पराभूत केले, तर भारताने माजी पाच वेळा चॅम्पियन मलेशिया आणि 2016 चे विजेते डेन्मार्कचा पराभव केला. भारताचे स्टार पुरुष खेळाडू किदाम्बी श्रीकांत आणि एसएस प्रणॉय यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आतापर्यंतचे सर्व पाच सामने जिंकले आहेत. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही प्रभावी कामगिरी केली आहे.