नवी दिल्ली : आयसीसी महिला T20 विश्वचषक 2023 स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर संध्याकाळी 6.30 वाजता खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांचे काही खेळाडू नवीन विक्रम करू शकतात. यामुळे हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. भारतीय महिला संघ पहिला T20 विश्वचषक जिंकण्यासाठी कडवी झुंज देऊ शकतत. T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या आजच्या दोन संघांमध्ये खूप फरक आहे. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाची 5 वेळा टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी टक्कर होणार आहे.
उपकर्णधार स्मृती मंधाना शानदार फॉर्ममध्ये :महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना शानदार फॉर्ममध्ये आहे. मंधानाने या स्पर्धेत 3 सामन्यांच्या 3 डावात 149 धावा केल्या आहेत. महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये स्मृती मंधाना सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये पहिला क्रमांक इंग्लंडच्या नेट सिव्हरचा आहे. तिने 4 सामन्यांच्या 4 डावात एकूण 176 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाची फलंदाज अॅलिसा हिली स्मृती मानधनाचा विक्रम मोडू शकते. 2023 च्या या स्पर्धेत, एलिसा हिलीने तीन सामन्यांमध्ये 73 च्या सरासरीने तीन डावात 146 धावा केल्या आहेत.