नागपूर : नागपूर : 16व्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली आहे. कसोटी सामन्यात शतक झळकावून, तो T20, ODI आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांनाही हा पराक्रम करता आला नाही. 2017 मध्ये, रोहितने प्रथमच वनडे आणि टी-20 मध्ये कर्णधारपद भूषवले.
केवळ तीन कर्णधारांनी केली कामगिरी :पदार्पणाच्या मालिकेत त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये २०८ धावा केल्या. याच दौऱ्यातील टी-20 सामन्यात रोहितने 118 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितपूर्वी केवळ तीन कर्णधारांना ही कामगिरी करता आली आहे. यामध्ये श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांचा समावेश आहे. त्यात आता रोहित शर्माच्या नावाचाही समावेश झाला आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत, अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.
रोहित शर्माची कारकिर्द :रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीत रोहित शर्मा ४६ वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने कसोटीत 9 शतके आणि 1 द्विशतकही झळकावले आहे. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २१२ आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये महेंद्रसिंग धोनी हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार ठरला आहे. धोनीने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकूण 13 सामने खेळले, त्यापैकी 8 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला आहे. धोनीनंतर अजिंक्य रहाणे या ट्रॉफीमध्ये यशस्वी कर्णधार ठरला आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकूण 4 सामने खेळले असून, त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत.