नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी (गुरुवारी) ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांत गुंडाळला. त्याचवेळी भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. संपूर्ण संघ 91 धावांत बाद झाला.
पंचांच्या परवानगीशिवाय जडेजाने केला मलमचा वापर :या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दंड ठोठावण्यात आला आहे. मैदानावरील पंचांच्या परवानगीशिवाय जडेजाने सामन्यात मलमचा वापर केला, ज्यासाठी तो दोषी ठरला आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल क्रिकेटर रवींद्र जडेजाला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. जडेजाने सामन्याच्या मध्यावर बोटावर काहीतरी ठेवल्याची चर्चा सुरू झाली. जडेजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल :या व्हिडीओमध्ये तो त्याचा सहकारी मोहम्मद सिराजकडून काहीतरी घेत आहे आणि तो डाव्या हाताच्या बोटावर घासतो आहे. यावर ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी खेळाडू प्रश्न उपस्थित करीत आहे. तथापि, भारतीय संघ व्यवस्थापनाने आयसीसी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टला सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये रवींद्र जडेजा त्याच्या तर्जनीला वेदना कमी करणारी क्रीम लावताना दिसत आहे.