नवी दिल्ली - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या बक्षीस रकमेत वाढ झाल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना रिजिजू यांनी ही माहिती दिली.
रिजिजू म्हणाले, ''आम्ही क्रीडा आणि शौर्य पुरस्कारांच्या बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा पुरस्कारांची बक्षिसाची रक्कम यापूर्वीच वाढवण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्काराची बक्षीस रक्कम अनुक्रमे १५ लाख आणि २५ लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी खेलरत्न पुरस्कार मिळालेल्या खेळाडूला साडेसात लाख रुपये तर अर्जुन पुरस्कारप्राप्त व्यक्तीला पाच लाख रुपये रोख रक्कम मिळत होती.''
दरवर्षी, २९ ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला भारत सरकारकडून हे पुरस्कार दिले जातात.