नवी दिल्ली : आयपीएल 2023 चा उद्घाटन सामना चारवेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवार, 31 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, दोन्ही संघ मजबूत आहेत आणि चाहते एक रोमांचक सामना पाहू शकतात. सामन्यापूर्वी, दोन्ही संघांमधील आतापर्यंतची आकडेवारी, खेळपट्टीचा अहवाल आणि दोन्ही संघांच्या 16व्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11 खेळाडूंविषयी आपण जाणून घेणार आहोत.
गुजरात टायटन्सची चेन्नई सुपर किंग्जवर आघाडी : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जवर आघाडी घेतली आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनले. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण दोन सामने झाले असून, दोन्ही सामने गुजरात टायटन्सने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा ३ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून पराभव केला. नावानुसार आयपीएलचा शेवटचा सीझन सीएसकेसाठी काही खास नसला तरी सीएसके या सीझनमध्ये मागील सीझन विसरून नवीन सुरुवात करेल.
अहमदाबाद स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल : अहमदाबाद स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी उपयुक्त खेळपट्टी आहे. जी फलंदाजांना अनुकूल मानली जाते, परंतु जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी संथपणे खेळू लागते. ज्यामुळे फिरकीपटूंना मदत होते. आकडेवारी दर्शवते की, नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले आणि बहुतेक सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी 170 धावांची आहे.