नवी दिल्ली -राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकणारा एकमेव भारतीय बॉक्सर मनोज कुमारने आपली खंत व्यक्त केली आहे. 'गेल्या सहा वर्षांपासून मला प्रायोजक नाही. त्यामुळे मला खुप ओढाताण होत आहे', असे मनोजने म्हटले. २ डिसेंबरपासून सुरू होणाऱया बिग बाउट लीगमध्ये मनोज एनसीआर पंजाबच्या संघातून ६९ किलो वजनाच्या गटात आपले आव्हान सादर करणार आहे.
हेही वाचा -विराट म्हणतो, 'या' खेळाडूला पकडणं 'मुमकिन ही नही नामुमकिन'
या लीगमध्ये त्याचा सामना अदानी गुजरातचा दुर्योधन सिंग नेगी, बॉम्बे बुलेट्सचा नवीन बुरा, उत्तर पूर्व रहिनोचा अंकित खटाना, ओडिशा वॉरियर्सचा उझबेकिस्तान बॉक्सर जय होंगिर रखमानोव आणि बंगळुरू ब्रेव्हर्सचा नायजेरियाचा बॉक्सर ओसोबो अब्दुल अफिस यांच्याशी होणार आहे.
लंडन आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या मनोजने सांगितले की, खेळादरम्यान झालेल्या दुखापतीचा सामना करण्यासाठी आपल्याला खुप पैसा खर्च करावा लागला आहे आणि अशा परिस्थितीत बिग बाऊट लीग आयोजित केल्याने माझी आर्थिक परिस्थिती पुन्हा रुळावर येण्याची आशा आहे.
'माझ्या वडिलांचे आणि मोठ्या भावाचे स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे. या लीगचे आयोजन करून मला माझ्या तयारीचा आढावा घेण्याची संधी मिळेल. असं असलं तरी, वर्षभर दुखापतीपासून दूर राहिल्यानंतर, संपूर्ण वातावरण आव्हानात्मक आहे', असे मनोजने म्हटले आहे.