नवी दिल्ली -टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मायदेशी परतला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे ग्रँड स्वागत करण्यात आले. यावेळी त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. यामुळे सुरक्षेचा बोजवारा उडाला.
नीरज चोप्रा विमानतळाबाहेर आल्यानंतर नागरिकांनी त्याची झलक पाहण्यासाठी गर्दी केली. प्रत्येक जण नीरज जवळ जाऊ इच्छित होता. यावेळी नागरिकांनी भारत माता की जय यासारख्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नीरज चोप्रा याने यावेळी भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती. तसेच त्याने मास्कही लावला होता.
यावेळी माध्यमांनी देखील मोठी गर्दी केली होती. इलेक्ट्रानिक मीडियाचे प्रतिनिधी हातात माईक तसेच कॅमेरे घेऊन तिथे उभे होते. यातून सुरक्षा रक्षकांनी नीरज चोप्राला बाहेर काढलं आणि त्याला पांढऱ्या कारमध्ये बसवून तिथून अशोका हॉटेलकडे रवाना केलं.
आज हॉटेल अशोकामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा खास सन्मान करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामिल होणार आहेत.