नवी दिल्ली: बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ( Commonwealth Games 2022 ) 14 बॉक्सर भारतीय बॉक्सिंग दलात पाठवले जात आहेत, ज्यांच्याकडून देशाला पदकांच्या मोठ्या आशा आहेत. हे सर्व खेळाडू बर्मिंगहॅम गेम्सपूर्वी तयारीत व्यस्त आहेत. या खेळांमध्ये सहभागी झालेल्या या खेळाडूंपैकी अनेकांनी जागतिक पटलावर आपले नाव कोरले आहे. त्याचबरोबर काही खेळाडू पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहेत. यापैकी एक बॉक्सर म्हणजे सागर अहलावत ( Boxer Sagar Ahlawat ) आहे.
सागर अहलावत म्हणतो की, 2015 मध्ये फ्लॉइड मेवेदर जूनियर आणि मॅनी पॅकियाओ यांच्यातील शतकातील लढतीवरील वृत्तपत्रातील लेख वाचून त्यांचे आयुष्य बदलले. हा लेख वाचल्यानंतर सात वर्षांनंतर, 20 वर्षीय बॉक्सर बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या +92kg सुपर हेवीवेट स्पर्धेत ( Men's +92kg Super Heavyweight Tournament ) प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करत आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. सागरने पीटीआयला सांगितले की, मी अभ्यासात चांगला नव्हतो. माझ्याने अभ्यास होत नव्हता. म्हणून मी बारावीनंतर काहीतरी करायचं म्हणून शोधू लागलो.
वर्तमानपत्रातील एका लेखाने बदलले आयुष्य -
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागरचा खेळाशी काहीही संबंध नव्हता. पण एके दिवशी त्याने वर्तमानपत्रात मेवेदर आणि पॅकियाओ यांच्यातील प्रसिद्ध संघर्षाबद्दल पूर्ण पानाचा लेख वाचला. दोन महान मुष्टियोद्धा आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्याने वाचले तेव्हा त्याला काय करायचे आहे हे स्पष्ट झाले. सागर म्हणाला, माझ्या कुटुंबातील कोणीही खेळात नाही. मला बॉक्सिंगबद्दल थोडेसे माहित होते, परंतु वर्तमानपत्रात मेवेदर आणि पॅकियाओबद्दल वाचून मला प्रेरणा मिळाली ( Reading about Mayweather and Pacquiao inspired ).