भोपाळ - कोरोना महामारीमुळे कालांतराने सुरूवात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरिल अॅथलॅटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पहिल्या दिवशी अनेक विक्रमाची नोंद झाली. यात हरियाणाचा भालाफेकपटू यशवीर सिंहने नवा विक्रम प्रस्तापित केला. तर धावपटू सुनिल दायर (मध्य प्रदेश) आणि अंकिता (उत्तराखंड) यांनी देखील शानदार कामगिरी केली.
हरियाणाचा भालाफेकपटू यशवीर सिंहने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. १८ व्या फेडरेशन ज्यूनियर कप स्पर्धेत २० वर्षाखालील गटात यशवीरने सर्वात लांब भाला फेकण्याचा विक्रम नोंदवला आहे. यशवीरने ७८.६८ मीटर लांब भाला फेकला. यासह त्याने नीरज चोप्रा याचा ७६.९१ मीटरचा विक्रम मोडीत काढला. नीरजने २०१५ साली हैदराबादमध्ये हा विक्रम केला होता. कोरोना महामारीनंतर प्रथमच क्रीडा स्पर्धांना सुरूवात झाली आहे. यात १८ वी फेडरेशन ज्यूनियर कप स्पर्धेला देखील सुरूवात झाली असून यात यशवीरने नवा विक्रम नोंदवला.
अंकिताने ५ हजार मीटर धावण्याची स्पर्धा १६ मिनिटे ३७.९० सेंकदात पूर्ण केली. तिने सुमन राठीचा विक्रम मोडला. सुमनने २०१८ साली कोईबतूरमध्ये ५ हजार मीटरचे अंतर १७ मिनिटे ०२.६७ सेकंदात पूर्ण केले होते.