हैदराबाद Chess Grandmaster : भारतीय बुद्धिबळपटू आर वैशालीनं शुक्रवारी (२ डिसेंबर) ग्रँडमास्टर (GM) किताब जिंकून इतिहास रचला आहे. हे विजेतेपद पटकावणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली. आर वैशालीनं स्पेनमधील चौथ्या एल लोब्रेगॅट ओपनमध्ये २५०० रेटिंग गुण मिळवत ग्रँडमास्टरचा खिताब पटकावला. या जेतेपदासह वैशाली तिचा भाऊ रमेशबाबू प्रज्ञानंदसह ग्रँडमास्टर खिताब जिंकणारी जगातील पहिली भाऊ-बहीणीची जोडी बनली आहे.
भारताची ८४ वी ग्रँडमास्टर : या गेमच्या दुसऱ्या फेरीत वैशालीनं तुर्कीच्या एफएम टेमेर तारिक सेल्बेसला पराभूत केलं. या विजयासह ती भारताची ८४ वी ग्रँडमास्टर बनली आहे. डिसेंबर २०२३ च्या FIDE रेटिंग यादीनुसार, आतापर्यंत केवळ ४१ महिला बुद्धिबळपटूंकडे ग्रँडमास्टरचा खिताब आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच वैशालीनं सलग दोन विजयांची नोंद केली होती. वैशालीच्या आधी कोनेरू हंपी आणि द्रोणवल्ली हरिका या दोन भारतीय महिलांनी ग्रँडमास्टरचा खिताब पटकवला आहे.
भाऊही ग्रँडमास्टर आहे :चेन्नईची रहिवासी असलेली वैशाली तिच्या कुटुंबातील एकमेव ग्रँडमास्टर नाही. तिचा भाऊ रमेशबाबू प्रज्ञानंद देखील ग्रँडमास्टरचा मानकरी आहे. आर. वैशालीनं आतापर्यंत एक्स्ट्राकॉन ओपन २०१९, कतार मास्टर्स २०२३ आणि FIDE महिलांच्या ग्रँड स्विस २०२३ मध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे. चौथ्या एल लोब्रेगॅट ओपनच्या दुसऱ्या फेरीत तामार तारिक सेलेब्सवर नुकत्याच मिळवलेल्या विजयानंतर तिचे ELO रेटिंग २५०१.५ वर पोहोचले. आता तिसर्या फेरीत तिचा सामना आर्मेनियाच्या समवेल तेर-सहक्यनशी होणार आहे.
एमके स्टॅलिन यांनी अभिनंदन केलं : वैशालीच्या या यशानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भाऊ-बहिणीच्या जोडीचं अभिनंदन केलं. "२०२३ हे वर्ष तुमच्यासाठी खास होतं. तुम्ही आता पहिले ग्रँडमास्टर भावंड आहात. तुमच्या कर्तृत्वाचा आम्हाला खूप अभिमान आहे. तुमचा उल्लेखनीय प्रवास महत्वाकांक्षी बुद्धिबळप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरेल. आमच्या राज्यातील महिला सक्षमीकरणाचं हे उदाहरण आहे", असं ते म्हणाले.
हेही वाचा :
- वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय, फॅन्सची धाकधूक वाढली
- अक्षरच्या फिरकीची कमाल, भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय; मालिकेत ३-१ ची विजयी आघाडी
- सुनील गावसकर पोहोचले 'सचीन' रेल्वे स्थानकावर! फोटो व्हायरल; जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन