नवी दिल्ली -संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पुढच्या आर्थिक वर्षात क्रीडा क्षेत्रासाठी २५९६.१४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रासाठी ८.१६ टक्के म्हणजेच २३०.७८ कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साइ) यंदाच्या अनुदानात १६०.४१ कोटी रुपयांची वाढ करून एकूण ६६०.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या क्रीडा क्षेत्रात एकीकडे 'हसू' तर दुसरीकडे 'आसू' असे चित्र निर्माण झाले आहे.
केंद्रीय क्रीडा खात्याचा महत्वाचा उपक्रम मानल्या जाणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी ६५७.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात खेलो इंडिया स्पर्धेसाठी ८९०.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.