मुंबई -जागतिक युथ तिरंदाजी स्पर्धेत मिहीर नितीन अपार याने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने अटातटीच्या सामन्यात अमेरिकेच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. अशा हरहुन्नरी खेळाडूचा सत्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला.
राजभवनात झालेल्या या सत्कार सोहळ्याला आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित होते. मिहीर नितीन अपार हा बुलडाणा जिह्यातील रहिवाशी आहे.
तिरंदाजी स्पर्धेकरिता उच्च दर्जाची कीट असणे गरजेचे आहे. त्याकरिता मिहीर अपारला शासनाने उच्च दर्जाची किट उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. यावर राज्यपाल कोश्यारी यांनी देखील तात्काळ मिहीरला किट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.