नाशिक : इंग्लंड येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नातींनी मोठा विक्रम केला आहे. माजी मंत्री छगन भुजबळ तथा आमदार पंकज भुजबळ यांच्या दोन्ही मुली कु. देविशा व कु. तनिष्का पंकज यांनी सुवर्ण कामगिरी करीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतासाठी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
भारताचे 12 स्पर्धक विविध वयोगटांत सहभागी :छगन भुजबळ यांच्या नाती कु. देविशा व कु. तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी मुंबई या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. इंग्लडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे 13 ते 18 फेब्रुवारीमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत 38 देशांतील 568 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारताचे 12 स्पर्धक विविध वयोगटांत आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारात सहभागी झाले होते.
महापौर सौ. जेन अल्डोस यांच्या हस्ते उद्घाटन :या स्पर्धेत देविशा भुजबळ हिने 19 वर्षांखालील कम्पाऊंड ब गटात सुवर्णपदक आणि तनिष्का भुजबळ हिने 17 वर्षांखालील कम्पाऊंड ब गटात 1 सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल केले आहे. भारतीय संघ हा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता. या स्पर्धेचे उद्घाटन मिडवे केंटच्या महापौर सौ. जेन अल्डोस आणि श्री. टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या हस्ते पार पडले.