रियाध (सौदी अरेबिया) FIFA World Cup Host : कतारमध्ये २०२२ चा फिफा वर्ल्डकप झाला होता. पश्चिम आशियातील देशात प्रथमचं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. हे वर्ल्डकपचं आयोजन अत्यंत यशस्वी ठरलं. फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनानं फायनलमध्ये फ्रान्सचा पराभव करून १९८६ नंतर प्रथमचं विश्वचषकावर नाव कोरलं.
सौदी अरेबिया विश्वचषक आयोजनासाठी उत्सुक : आता भविष्यात आणखी एक वर्ल्डकप पश्चिम आशियात होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील सौदी अरेबिया या देशानं २०३४ च्या फिफा विश्वचषकासाठी दावा ठोकलाय. सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशन (SAFF) ने सोमवारी इरादा पत्र (LOI) सादर केलं आणि २०३४ विश्वचषकासाठी बोली लावण्यासाठी स्वाक्षरी केली. सौदी अरेबियानं गेल्या बुधवारी फिफा विश्वचषक २०३४ साठी बोली लावण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. आता SAFF अध्यक्ष यासेर अल मिसेहल यांनी स्वाक्षरी केलेले इरादा पत्र अधिकृतपणे फिफाकडे सुपूर्त केलं आहे.
फुटबॉलच्या नवीन संधी निर्माण होतील : SAFF ने म्हटलं आहे की, २०३४ फिफा विश्वचषकासाठी बोली लावण्याचा सौदी अरेबियाचा इरादा एक ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे देशात फुटबॉलच्या नवीन संधी निर्माण होतील. तसंच यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात खेळाच्या वाढीस समर्थनही मिळेल. अल मिसेहल म्हणाले की, आमच्यासाठी हा एक रोमांचक प्रवास असून आम्ही यासाठी तयारी सुरू केली आहे. सौदी अरेबिया २०१८ पासून फुटबॉल, मोटरस्पोर्ट्स, टेनिस, अश्वारोहण, ईस्पोर्ट्स आणि गोल्फ यासह ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन करत आहे.
फिफा विश्वचषक सर्वात लोकप्रिय स्पर्धा : फिफा विश्वचषक ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा आहे. २०२२ चा फिफा विश्वचषक अर्जेंटिनानं गतविजेत्या फ्रान्सला हरवून जिंकला होता. अहवालानुसार, तब्बल ३२ दशलक्ष लोकांनी जियो सिनेमावर विश्वचषकाची फायनल मॅच पाहिली होती. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर सामना, विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
- Cricket World Cup २०२३ : आगामी सामन्यांमध्ये प्लेइंग ११ निवडणं भारतासाठी सोपं नाही, अश्विनला संधी मिळेल का?
- Asian Games २०२३ : ...तर भारतही चीन, जपानप्रमाणे ढिगानं पदकं जिंकेल, मात्र...