हैदराबाद FIFA World Cup 2026 : भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी, २०२६ फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या पात्रता फेरीतील दुसऱ्या लीग सामन्यात कतारविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागला. ओडिशातील कलिंगा स्टेडियमवर आशियाई चॅम्पियन कतारनं संपूर्ण ९० मिनिटं वर्चस्व राखलं. या पराभवामुळे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या विश्वचषकाच्या स्वप्नाला धक्का बसलाय. मात्र अजूनही भारत फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतो.
भारताच्या गटाची स्थिती : विश्वचषकाच्या दुसऱ्या पात्रता फेरीत भारत 'अ' गटात आहे. या गटात भारतासह कुवेत, कतार आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर कतार गटात पहिल्या स्थानावर असून, कुवेत दुसऱ्या स्थानावर आहे. कतारविरुद्ध पराभवानंतर भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. भारतानं पहिल्या सामन्यात कुवेतविरुद्ध १-० असा विजय मिळवला होता. सध्या भारत आणि कुवेतचे समान गुण असले तरी, कुवेत (+ ३) चांगल्या गोल फरकामुळे भारताच्या (- २) वर आहे.
पात्रता स्वरूप :गट 'अ' मधील सर्व चार संघ नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत दुहेरी राऊंड-रॉबिन स्वरूपात पात्रता सामने खेळत आहेत. टीम इंडियाला तिसऱ्या फेरीत जाण्यासाठी आणि २०२७ एफसी आशियाई कपमध्ये स्थान पक्क करण्यासाठी आपल्या गटात पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवावं लागेल. भारतानं अव्वल दोनमध्ये स्थान मिळवलं, तर ते २०२४ मध्ये तिसऱ्या फेरीच्या ड्रॉमध्ये सामील होतील. तेथे ते इतर गटातील विजेते आणि उपविजेत्यांशी स्पर्धा करतील.