चेन्नई : अझरबैझान इथं सुरू असलेल्या फिडे बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोमवारी भारतीय युवा खेळाडू रमेशबाबू प्रज्ञानंद यानं अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा पराभव केला. अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना हा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असल्यानं रमेशबाबू प्रज्ञानंदच्या विजयाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या खेळाडूला पराभूत करणारा रमेशबाबू प्रज्ञानंद हा तिसरा खेळाडू ठरला आहे. आता अंतिम फेरीत रमेशबाबू प्रज्ञानंदचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू आणि माजी विश्वविजेता असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे.
टायब्रेकरमधील पहिले दोन गेम अनिर्णित :रमेशबाबू प्रज्ञानंदनं सोमवारी जोरदार खेळाचं प्रदर्शन केलं. अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा पराभव करत भारतीय युवा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदनं या खेळावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या सामन्यात रमेशबाबू प्रज्ञानंदनं अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला. पहिले दोन टायब्रेक गेम अनिर्णित होते. मात्र तिसर्या गेममध्ये रमेशबाबू प्रज्ञानंदनं कारुआनाचा पराभव करून पुढचा गेम बरोबरीत सोडवला. रमेशबाबू प्रज्ञानंदनं त्याचे पहिले दोन क्लासिक गेम ड्रॉ केल्यानंतर सामना टायब्रेकरवर गेला होता.
मोठ्या बहिणीकडून घेतली प्रेरणा :भारतीय युवा बुद्धीपळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदनं अत्यंत कमी कालावधीत यश मिळवलं आहे. रमेशबाबू प्रज्ञानंद यानं त्याच्या मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेत बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या तिसऱ्यात वर्षी त्यानं बुद्धीबळाच्या खेळाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला सुरुवात केली. त्यामुळे रमेशबाबू प्रज्ञानंद हा आपल्या यशाचं सारं श्रेय आपली बहीण वैशाली यांना देतो. रमेशबाबू प्रज्ञानंद याला टीव्हीवर कार्टून पाहण्याची सवय होती. त्यामुळे वैशाली यांनी रमेशबाबू याची ही सवय सोडवण्यासाठी बुद्धीबळाचा खेळ शिकवल्याचं रमेशबाबू प्रज्ञानंदनं स्पष्ट केलं आहे.
टीव्हीवर कार्टून पाहण्याचा होता छंद :भारतीय बुद्धीबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंद याला टीव्हीवर कार्टून पाहण्याचा छंद होता. त्याचे तासंतास कार्टून पाहण्यात जात होते. त्याच्या मोठ्या बहीण असलेल्या वैशाली यांनाही कार्टून पाहण्याचा छंद होता. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी मुलांचा कार्टून पाहण्याचा छंद सुटण्यासाठी त्यांना बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा दिली. वैशाली यांची सवय सोडण्यासाठी आम्ही बुद्धीबळाकडं त्यांना जोडलं होतं. मात्र त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनी करिअर म्हणून बुद्धीबळ निवडलं. आता दोघंही चांगलं नाव करत असल्याची माहिती रमेशबाबू प्रज्ञानंद यांच्या वडिलांनी दिली.
हेही वाचा -
- Little Grand master : चौदा वर्षांचा भरत सुब्रमण्यम बनला भारताचा ७३वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर