लंडन - सातवेळा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन लुईस हॅमिल्टनला आता 'सर लुईस हॅमिल्टन' या नावाने ओळखले जाईल. यूके सरकारने हॅमिल्टनचा नाईटहूड पदवी देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हॅमिल्टनने यंदा जर्मनीचा दिग्गज फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शूमाकरच्या विक्रमाची बरोबरी केली. शिवाय, त्याने शूमाकरच्या सर्वाधिक फॉर्म्युला वन शर्यती जिंकण्याचा विक्रमही मोडित काढला.
हेही वाचा - सय्यद मुश्ताक अली चषक : अनुस्तुप मजूमदार बंगाल संघाचा कर्णधार
३५ वर्षीय हॅमिल्टन नाईटहूड मिळवणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी, टेनिसपटू अॅन्डी मरे याला वयाच्या २९ व्या वर्षी आणि ३२ व्या वर्षी सायकलपटू ब्रॅडली विगिन्स आणि ख्रिस होई यांना हा सन्मान मिळाला आहे.
हा सन्मान मिळविणारा हॅमिल्टन चौथा फॉर्म्युला वन चालक आहे. त्यांच्या आधी जॅक ब्रहम (१९७८), स्टर्लिंग मॉस (२०००) आणि जॅकी स्टीवर्ट (२००१) यांना नाईटहूड सन्मान मिळालेले आहेत.
मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद -
यंदा हॅमिल्टन याने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्सचा किताब आपल्या नावावर केला आहे. या विजयासह हॅमिल्टनने आपल्या संघाला म्हणजेच मर्सिडीजला सलग सातवे सांघिक जेतेपद मिळवून दिले होते. मर्सिडीजचा संघ सलग सात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला. त्यांनी फेरारीचा सलग सहा विजेतेपदाचा विक्रमही मोडला. फेरारीने १९९९ ते २००४ या काळात अनुभवी मायकेल शूमाकरसह सलग सहा विजेतेपदे जिंकली होती.