श्रीगंगानगर (राजस्थान) - टोकियोत सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची अवनी लेखरा हिने सुवर्ण पदक जिंकले. अवनी लेखराने महिला 10 मीटर एअर रायफलच्या (एसएच1) अंतिम सामन्यात सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. ती एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. विजयानंतर अवनी लेखराचे वडिल प्रविण लेखरा यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली.
ईटीव्ही भारतशी बोलताना प्रविण लेखरा म्हणाले की, अवनी एअर रायफल नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केलं. फेब्रुवारी 2012 मध्ये आग्रा येथे झालेल्या अपघातानंतर अवनीचे आयुष्य बदलले.
अपघातानंतर अवनीला ठीक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या डॉक्टरांकडे उपचार घेतले. अपघातावेळी अवनी कारच्या मागील सीटवर झोपली होती आणि अचानक अपघात झाला. या अपघातात अवनीच्या कमरेखालच्या भागाने काम करणे बंद केले, असल्याचे देखील प्रविण लेखरा यांनी सांगितलं.
अवनी लेखरावर जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात जवळपास 3 महिने उपचार सुरू होते. पण यात ती पूर्ण पणे ठीक होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर अवनी खेळाकडे वळाली.