नवी दिल्ली - भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये झालेल्या ' समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत' सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत तिने १०० मिटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी करत भारताला अवघ्या ११.२ सेकंदात सुवर्णपदक मिळवून दिले. आता माझे पुढील लक्ष्य २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर असणार असल्याचे, द्युती चंदने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
द्युती चंद म्हणाली, की समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धा जिंकणे सोपे नव्हते. कारण स्पर्धेत युरोपचे खेळाडू चांगली कामगिरी करत होते. तसेच युरोपच्या खेळाडूंनी अनेक रेकार्डही बनवली आहेत. यामुळे ही स्पर्धा म्हणावी तशी सोपी ठरली नाही. मात्र, मी स्पर्धेत स्वतःचा रेकार्ड पहिल्यापेक्षा कसा चांगला होईल याचा विचार केला आणि स्पर्धेत उतरले. यामुळेच मला सुवर्णपदक मिळाले, असे तिनं सांगितले.
द्युती चंद हिने आपल्या विजयाचे श्रेय उडिशा सरकार आणि आर्थिक मदत करणारे तसेच आपल्या चाहत्यांना दिले. वाईट काळात मला या लोकांनी साथ दिल्यानेच मी हे विजय मिळवू शकले, अशी भावना तिने व्यक्त केली.
बहिणीची साथ -
जेव्हा मी धावण्याच्या खेळात आले, तेव्हा फक्त माझ्या बहिणीने मला साथ दिली. तिने मला आर्थिक मदत केली. बहिणीच्या विश्वासामुळे माझ्या खेळात प्रगती होत गेली. पुरस्कार मिळू लागले आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मला मदत करायला सुरूवात केली.