नवी दिल्ली - भारताचा युवा घोडस्वार फवाद मिर्झाने भारताची अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेरीस संपवली. त्याने घोडेस्वारीमध्ये टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स (एफइआई) कडून मंगळवारी याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांनी टोकियो ऑलिम्पकसाठी पात्र खेळाडूंची यादी प्रसिध्द केली आहे.
भारताला तब्बल २० वर्षानंतर घोडेस्वारीमध्ये ऑलिम्पिक कोटा मिळाला आहे. यापूर्वी घोडेस्वारी प्रकारात १९९६ मध्ये विंग कमांडर एलजे लांबा यांनी अटलांटा ऑलिम्पकमध्ये तर २००० साली इम्तियाज अनिस याने सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
२७ वर्षीय फवादने गेल्या काही स्पर्धांमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. त्याने २०१८ मध्ये जकार्ता एशियन गेम्स स्पर्धेत खेळताना, भारताला तब्बल ३६ वर्षानंतर पदक जिंकून दिले आहे. तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारा भारताचा पहिला घोडेस्वार आहे.