भुवनेश्वर - नुकत्याच पार पडलेल्या 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'च्या पहिल्या हंगामात भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदने दुसरे सुवर्णपदक पटकावले. द्युतीने २०० मीटर स्पर्धेत ही कामगिरी केली.
हेही वाचा -...तोपर्यंत भारतीय संघाला 'महान' म्हटले जाणार नाही
कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीचे (केआयआयटी) प्रतिनिधीत्व करत असलेल्या २४ वर्षीय द्युतीने २३.६६ सेकंदाची वेळ नोंदवली. तर, मुंबई विद्यापीठाची धावपटू कीर्ती विजय भोईटेने २४.९८ सेकंदाची वेळ घेत रौप्यपदक पटकावले.
उत्कल विद्यापीठाच्या दीपाली महापात्राने २५.१९ वेळ घेत कांस्यपदक जिंकले. '२०० मीटरमध्ये सुवर्ण जिंकणे खूप चांगले वाटले. १०० मीटर मध्ये, पूर्ण थ्रॉटलमध्ये कधी धावायचे आणि थोडासा आराम कधी करायचा हे समजणे कठीण आहे, परंतु २०० मीटरमध्ये, कधी वेगाने धावणे आणि कधी आराम करायचा हे समजणे सोपे आहे. मात्र, धावपटूला २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जास्त काम करावे लागते, 'असे द्युतीने विजयानंतर सांगितले.
यापूर्वी, तिसऱ्या लेनमध्ये धावणाऱ्या द्युतीने १०० मीटर स्पर्धेत ११.४९ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी, तिने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ११.२२ सेंकदाची विक्रमी वेळ नोंदवली होती. ऑलिम्पिक पात्रता गाठण्यासाठी ११.१५ सेंकदाची वेळ ठेवण्यात आली आहे.