रांची -भारताची आघाडीची महिली धावपटू द्युती चंदने राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत मोठा पराक्रम करून दाखवला. ५९ व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या १०० मीटर स्पर्धेत द्युतीने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकही आपल्या नावावर केले.
हेही वाचा -टीम इंडियाची आफ्रिकेवर ५ गड्यांनी मात, मालिकाही खिशात
२३ वर्षीय द्युतीने या स्पर्धेतील उपांत्य फेरीत ११.२२ सेकंदाची वेळ नोंदवली. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ११.२६ सेकंदाची वेळ नोंदवली होती. दोन आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या दोहा येथील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात द्युतीला अपयश आले होते.
या स्पर्धेमध्ये तिने ११.४८ सेकंदाची वेळ नोंदवत सातवे स्थान राखले होते. पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अमिया कुमार मलिक सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने मलेशियाच्या जोनाथन अनाकमायेपा याला मागे टाकले आणि १०.४६ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंग याने कांस्यपदक प्राप्त केले.