नई दिल्ली/नोएडा -गौतमबुद्ध नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना इतिहास रचत देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. आता त्यांनी ज्या बॅडमिंटन रॅकेटच्या साहाय्याने हे पदक जिंकले त्याचा ई लिलाव केला जात आहे. दरम्यान, हा लिलाव केंद्र सरकारकडून केला जात असून यावर आतापर्यंत करोडो रुपयांची बोली लागली आहे.
जिल्हाधिकारी सुहास एलवाय यांच्या रॅकेटवर आतापर्यंत चार बिल्डर्संनी बोली लावली आहे. शुक्रवारी (17 सप्टेंबर) सुरू झालेल्या या लिलावासाठी रॅकेटची बेस प्राइज 50 लाख इतकी ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत ही बोली 10 करोड पर्यंत पोहोचली आहे. 7 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत यावर बोली लावता येणार आहे.
सुहास एलवाय यांच्या रॅकेटचा लिलाव केंद्र सरकारची वेबसाइट पीएम मेमेंटोज यावर चालू आहे. दरम्यान, या ई लिलावातून मिळणारा पैसा नमामि गंगे या प्रोजेक्टसाठी दिला जाणार आहे.