पॅरिस - दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या भारतीय महिला रिकर्व संघाने आज रविवारी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात मेक्सिकोचा ५-१ असा एकतर्फा धुव्वा उडवला. याआधी शनिवारी कंपाउंड वैयक्तिक स्पर्धेत अभिषेक वर्नाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.
विश्व तिरंदाजीच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन भारतीय संघाविषयी माहिती देण्यात आली. यात त्यांनी म्हटलं आहे की, भारतीय संघाने पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. पॅरिसमध्ये विश्वचषक स्टेज ३ च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पण ही स्पर्धा ऑलिम्पिकच्या क्वालिफायसाठी नव्हती.